भगवद्गीता काय शिकविते ?

श्रीमद् भगवद्गीतेचे सर्वात मोठे वैशिष्टय कोणते? तर श्रीमद् भगवद्गीता हे तारतम्याचे शास्त्र आहे. या विधानाचा अर्थ असा की- भगवद्गीता ही आपल्या नेहमीच्या प्रपंचामध्ये आणि अपेक्षित परमार्थसेवेमध्ये तर-तम-भाव सांगते! ती मनुष्यमात्राचा सारासार विचार जागवू पाहते. ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाक्रमासाठी अचूक आणि मौलिक मार्गदर्शन करते. आपल्या नेहमीच्या जीवनात, जेव्हा जेव्हा मनवस्था प्रसंग आठवतो, तेव्हा तेव्हा श्रीमद् भगवद्गीता आपणास अचूक मार्गदर्शन करते.

तसे पाहिले तर भौतिक कुरूक्षेत्रावरचे युद्ध, तसे तुलनेने सोपे असते. पण आपल्या मानसिक कुरूक्षेत्रावरचे युद्ध, फार फार कठीण असते. म्हणजे असे म्हणता येईल की, एका बाजूला चांगले आणि दुसर्‍या बाजूला वाईट, अशी स्पष्ट विभागणी असते तेव्हा, आपण कोणते पक्ष घ्यायचा, ते ठरविणे सोपे असते. पण मानवी जीवनात, काळ्या आणि पांढर्‍या रंगांपेक्षा मिश्रित रंगच जास्त असतात. त्यावेळी काय करायचे? अशावेळी गीता आपणास सांगतो की-
१) ज्याने अंतिमत: चांगले घडेल, त्याची बाजू घ्यायची.
२) व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला किंवा राष्ट्रहिताला प्राध्यान्य द्यायचे.
३) कोणत्याही परिस्थितीत माणुसकीचा म्हणजे मानवतेचा धर्म सोडावयाचा नाही.

या तीन कसोटयांवर जो उतरतो, त्यालाच भगवद्गीता ‘सत्यधर्म’ म्हणते. ‘सत्त्वधर्म’ म्हणते. हाच तो गीताप्रणीत निष्काम र्कमयोग होय. आसक्तिरहित र्कमयोग होय. स्वधर्मनिष्ठ जीवनयोग होय. स्वर्कतव्यनिष्ठ जीवनयोग होय. भगवद्गीतेच्या परिभाषेत, यालाच ‘समत्वयोग’ म्हणतात. हा ‘समत्वयोग’ आपणाला समष्टिशरणता शिकवतो, समाजसेवा शिकवतो. आणि त्यासाठीच संतुलन म्हणजे तारतम्य शिकवतो. उदाहरणाने बोलायचे तर-अर्जुनाच्या दोन प्रतिज्ञा होत्या.
१) जो माझ्या विजयधनुष्याचा अपमान करील, त्याला मी मृत्युदंड देईन.
२) ज्यांनी द्रौपदीवस्त्रहरणासह अनेक पापे केली, त्या दुष्ट कौरवांचा विनाश करीन.

पुढे योगायोगाने असे घडले की, धर्मराज युधिष्ठिराने अनवधानाने, विजय धनुष्याचा अपमान केला. तेव्हा आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुन हा, आपल्या थोरल्या भावाला मृत्युदंड द्यायला, सिद्ध झाला. असा हा प्रचंड अनवस्थाप्रसंग अवतरला. सुदैवाने त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जवळ होता, त्याने तारतम्याचे अचूक मार्गदर्शन केले. समजा अर्जुनाने आपली पहिली प्रतिज्ञा पूर्ण केली असती तर, युधिष्ठिर मृत्युमुखी पडला असता आणि मग पांडव पक्षाचे काय झाले असते? अशावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला कौरव-विनाशाची आपली सामाजिक प्रतिज्ञाच पूर्ण करायला सांगितले आणि पहिली प्रतिज्ञा, ‘थोरल्या भावाला उद्देशून कटू वचन उच्चारणे’ या शिक्षेवरच भागवायला सांगितले. याला म्हणतात तारतम्य भगवद्गीता ही व्यक्तिहितासाठी समाजहिताचा बळी द्यायला, कधीच सांगत नाही, सांगणार नाही! कारण ती तारतम्याचे शास्त्र आहे.

हाच तो तर-तम भाव आहे. आणि त्याचे स्पष्ट दर्शन, जसे प्रत्यक्ष श्रीकृष्णचरित्रात घडते, तसेच ते श्रीकृष्णाने उपदेशिलेल्या, गीतोक्त तत्त्वज्ञानातही घडते. ह तर-तम भाव म्हणजे अत्युच्य आणि अंतिम ध्येयसिद्धीसाठी साधावा लागणारा समतोल आहे, संतुलन आहे. समन्वय आहे, सुसंवाद आहे. यालाच भगवद्गीता विवेकबुद्धी म्हणते. सारासार विचार म्हणते समत्वयोग म्हणते. भगवतांनी सांगितलेला हा समत्वयोग आपणाला महत्वाच्या चार गोष्टी सांगतो.
१) जीवनात प्रत्येक बाबतीत समतोल राखायचा संतुलन ठेवायचे.
२) कोणत्याही घटनेच्या सर्व पैलूंचे दर्शन घ्यायचे.
३) जीवनात सर्वत्र, सर्व बाबतीत अतिरेक टाळायचा.
४) नेहमी सारासार विवेक जागृत ठेवायचा.

स्वत: भगवंतानी भगवद्गीतेत अनेक बाबतीत, हे संतुलन सांगितले आहे. त्यासंबंधी उल्लेख करायचे तर-आहार-विहार, ध्यान-धारणा, दान-तप, तृष्णा-भावना, प्रतिकार-प्रतिज्ञा, शरीरसंयम-मनोसंयम, संन्यासी-नित्यसंन्यासी, प्रपंच-परमार्थ या सर्व बाबतीत भगवंताना संतुलन हवे आहे. एवढेच नव्हे तर, ज्ञानयोग, ध्यानयोग, र्कमयोग आणि भक्तियोग या चार पारमार्थिक साधनांमध्येही, युक्तता हवी, समत्व हवे असेच भगवंतांचे सांगणे आहे.

भगवद्गीतेत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण म्हणतो की-‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवाद…’ ही ब्रह्मविद्या प्राधान्याने उपनिषदातील आहे. तसेच समाजधारणा करणार्‍या समाजनियामक ग्रंथातील आहे. भगवद्गीतेने मोठी युक्ती केली. तिने उपनिषदांतील आत्मज्ञान हे साध्य म्हणून सांगितले आणि समाजनियामक शास्त्रातील, प्रत्येक व्यक्तीसाठीचा र्कतव्यसिद्धांत हा साधन म्हणून सांगितला. असा तर्‍हेने साध्याला साधनाची जोड मिळताच, योगशास्त्र हे प्रयोगशास्त्र झाले. हेच नेमकी श्रीकृष्णार्जुनसंवादातील गीतेचे रहस्य आहे.लोकमान्य टिळक त्यालाच निष्काम र्कमयोग म्हणतात. आत्मज्ञानाशिवाय निष्कामता येत नाही. आणि र्कतव्यभावनेविना र्कमयोग साधत नाही. पण याच दोन गोष्टी साधल्या पाहिजेत, असे गीतेचे सांगणे आहे. ‘र्कमण्येवाधिकारस्ते…’ ही गीतेचे शिकवण आहे.

Leave a comment