भगवद्गीता का जन्मली ?

तसे पाहिले तर वीरश्रेष्ठ अर्जुन कुरूक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहिला होता, तो पूर्ण निश्चयाने आणि र्कतव्यभावनेने! क्षत्रिय वृत्ती तर त्याच्या स्वभावात होती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई करूनही युद्ध टळत नव्हते, टळणार नव्हते. ही सारी परिस्थिती पराक्रमी अर्जुनाला पूर्णपणे माहिती होती. तसेच कुरूक्षेत्राच्या रणांगणावर येण्यापूर्वी,अर्जुन हा युद्धाला उत्सुक नव्हता,असे महाभारतात कोठेही आढळत नाही.उलट वनवासाचा कालखंड संपवून,परत आल्यापासून अर्जूनाने मोठया प्रयत्नाने,पाशुपतास्त्र मिळवले होते.

तसेच महाभारतातील उद्योगपर्वात युद्धाच्या तयारीचे संपूर्ण वर्णन आढळते. त्या सार्‍या वर्णनात अर्जुनाच्या विषादाचा कुठे साधा उल्लेखही आढळत नाही. तसेच प्रत्यक्ष युद्धापूर्वी कपटी धृतराष्ट्राने, मायावी नीतीचा आणखी एक प्रयत्न केला होता. त्याने प्रत्यक्ष संजलाच आपला दूत म्हणून पांडवांकडे पाठविले होते आणि कौरव-पांडवात महायुद्ध झालेे तर, त्याचे किती घोर परिणाम होतील, हे मुद्दाम सांगितले होते.या कपटी नीतीला मंत्रणा युद्ध म्हणतात. पण या कशाचाच पांडवांवर परिणाम झाला नव्हता. उलट वीरश्रेष्ठ अर्जुन रोखठोकपणे म्हणाला होता-“आता आपण कौरवांना रणांगणावरच भेटू!”(महाभारत,उद्योगपर्व,अध्याय२५,२८)

मग घडले काय? तर कितीही कल्पना असली तरी प्रत्यक्ष रणांगणावर भीष्म, द्रोण इत्यादी पूजनीय व्यक्ती,महायुद्धासाठी समोर पाहिल्यावर मुळातच ऋजु मनाचा म्हणजे हळव्या आणि सरळ मनाच्या, अर्जुनाला धक्का बसला. तो पूर्णपणे हादरला. क्षणिक भावनेच्या आहारी गेला. विषण्ण झाला. त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. यातून तो विशिष्ट भावनेच्या समर्थनासाठी, युक्तिवाद करू लागला.पण यातील काहीच आंतरिक नव्हते. सारे प्रसंगानुरूप जन्मलेले आणि उसने होते.

म्हणजे अर्जुनाला स्वजनांचा मोह पडला होता. कुरूक्षेत्रावरील या घनघोर प्रसंगी, वीरश्रेष्ठ अर्जुनाच्या मनात, स्वजनांबद्दलची आसक्ती जागी झाली होती. मग या आसक्तीतून जन्मलेल्या मोहाने, त्याचीे कर्तव्यनिष्ठा पूर्णपणे ग्रासून टाकली आणि मग या खरे तर दुष्ट कौरवांना शासन करायला आलेला अर्जुन, आता उसने तत्त्वप्रतिपादन करू लागला. आपली आसक्ती, आपला मोह झाकून ठेवण्यासाठी वरवर तत्त्वचिंतनाची भाषा बोलू लागला.पण ही तात्त्विकता मूळ स्वभावातून झालेली नव्हती. ती आपल्या माणसांच्या आसक्तीतून आली होती. हे तत्त्वचिंतन वरकरणी होते, उसने होते.

खरे तर सारेच कौरव आपल्या आत्तापर्यंतच्या अधर्मी आणि अन्यायी वागण्याने,सार्‍या पृथ्वीलाच भारभूत झाले होते. त्यांना शासन करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी ‘धर्म्य युद्धाची’ तयारी करावीच लागणार होती. पण हे सारे अर्जुन विसरला. कळस म्हणजे द्रौपदीची विटंबनाही विसरला. कारण फक्त एकच! स्वजनांची आसक्ती, त्या आसक्तीतून मोह आणि मोहातून कर्तव्याचे विस्मरण! अशी ही सारी अनर्थपरपंरा जन्मास येत होती. ही स्थिती श्रीकृष्णाने नेमकी ओळखली. आणि तो अर्जुनाला म्हणाला, “अरे, स्वत:चे र्कतव्य टाळण्यासाठी, तथाकथित बुद्धीवाद मला कशासाठी ऐकवतो आहेस?”

अरे, जे खरे वैराग्यसंपन्न असतात, आत्मज्ञानी असतात, त्यांना आपले आणि इतरांचे हे जडदेह मृत्यू येउुन नष्ट होणार, हे आतून आणि पक्केपणाने माहिती असते. ते कधी शोकव्याकूळ होत नाहीत. कारण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी या दोहोंमधील नेमका फरक त्यांना कळतो. ते समत्त्वयोगी असतात. त्यांना आत्म्याची अमरता आणि अखंडता कळते. मानवी देहाची क्षणभंगुरताही समजते आणि या जीवनात आपले र्कतव्य अपरिहार्यपणे पार पाडले पाहिजे, हेही ध्यानात येते.

अरे, जे खरे वैराग्यसंपन्न असतात, आत्मज्ञानी असतात, त्यांना आपले आणि इतरांचे हे जडदेह मृत्यू येऊन नष्ट होणार, हे आतून आणि पक्केपणाने माहिती असते. ते कधी शोकव्याकूळ होत नाहीत. कारण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी या दोहोंमधील नेमका फरक त्यांना कळतो. ते समत्त्वयोगी असतात. त्यांना आत्म्याची अमरता आणि अखंडता कळते. मानवी देहाची क्षणभंगुरताही समजते आणि या जीवनात आपले कर्तव्य अपरिहार्यपणे पार पाडले पाहिजे, हेही ध्यानात येते.

म्हणजे तुम्हाला, मला, प्रत्येकाला विवेकशील कर्तव्ययोगाचे स्मरण करुन देण्यासाठी गीता जन्मली आहे. प्रत्येक माणसाच्या जगण्याला, आदर्श प्रयोजन हवे. सारासार विचार करणारा जीवन हेतू हवा. त्यालाच भगवान श्रीकृष्ण स्वधर्म म्हणतात. त्याचेच सर्वांना आणि सर्वकाळात स्मरण करून देण्यासाठी गीता जन्मली.

Leave a comment