महाभारतीय युद्धाची पार्श्वभूमी

खरं तर कौरव पांडव हे बालपणी एकत्र राहिलेले. खेळलेले, शिक्षण घेतलेले चुलत भाऊ, मग ते एकमेकांसमोर युद्धासाठी का बरं उभे राहिले? याचं एक आणि एकमेव कारण आहे ते म्हणजे – कौरवांच्या मनात पांडवांविषयी असणारा द्वेष, मत्सर, आसूया. बालपणीचाच एक प्रसंग आपण बघूया.

द्रोणाचार्यांकडे कौरव-पांडव शिक्षण घेऊ लागले. मल्लयुद्ध, कुस्ती या प्रकारची दुर्योधान आणि भीम दोघांनाही आवड. पण भीमापुढे दुर्योधनाचे काही चालेना. होता होता दुर्योधन भीमाचा  द्वेष करू लागला आणि एकदा तर या द्रोहाने, द्वेषाने अत्यंत उग्र रूप धारण केले. एके दिवशी पोहायला म्हणून कौरव-पांडव गंगाकिनारी गेले. मनसोक्त पोहून झाल्यावर, सगळ्यांनाच खूप भूक लागली. त्या वेळच्या जेवणात दुर्योधनाने भीमाला कालकूट विष मिसळलेले लाडू मोठ्या आग्रहाने खाऊ घातले आणि त्यानंतर त्याला गंगेमध्ये फेकून दिले. या संकटातून भीम सहीसलामत सुटला.

कौरव पांडव लहानाचे मोठे होऊ लागले. आता कुणाला तरी यौवराज्याभिषेक करायला हवा होता आणि या पदावर धर्मराजाचाच अधिकार होता. कारण धृतराष्ट्र हा वयाने मोठा असूनही जन्मतःच अंध असल्याने, पंडूकडे राज्यपद आले होते. धर्मराज हा त्याचा मुलगा त्यामुळे राजपदावर अधिकार त्याचाच आणि वयाचा विचार केला तरी युधिष्ठिर हा वयानेही दुर्योधनपेक्षा मोठा.

भीष्मांच्या सांगण्यानुसार धर्मराजाला यौवराज्याभिषेक झाला. राज्यातील सर्व लोक खूष होते. मात्र दुःखी होता धृतराष्ट्र. पुत्रप्रेमामुळे तो सचिंत झाला. त्याला अन्न गोड लागेना. त्याची झोप उडाली. शेवटी त्याने ‘कणिक’ नावाच्या कुटील नीतीत प्रवीण असलेल्या, अमात्याला बोलावून आणले. त्याच्याजवळ आपले मन मोकळे केले. मग कणिकाने धृतराष्ट्राला सल्ला दिला की, ‘तू पांडवांचा काटा आपल्या मुलांच्या मार्गातून दूर करायला पाहिजेस.’ धृतराष्ट्र संतुष्ट झाला.

आपल्या वडिलांसारखीच दुर्योधनाची अवस्था झाली होती. युवराज म्हणून झालेली युधिष्ठिराची निवड, पाच पांडवांचा पराक्रम, लोकांकडून होणारी त्यांची स्तुती यातलं काहीच त्याला सहन होत नव्हतं. म्हणूनच वडिलांच्या परवानगीने दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण या चौघांनी मिळून एक कुटील डाव रचला.

तो डाव म्हणजे वारणावत इथे बांधण्यात आलेले लाक्षागृह. विरोचन नावाच्या वसतुशास्त्रतज्ञाला सांगून, ज्वालाग्राही पदार्थ वापरून, चटकन पेट घेईल असा एक वाडा वारणावत या गावी बांधण्यात आला. मोठ्या आग्रहाने कुंतीसह पांडवांना तिथं धाडण्यात आलं. त्यांना जाळून मारण्याचा कौरवांचा बेत होता. पण मारण्यापेक्षा तारणारा मोठा होता. विदुराच्या सवधपणामुळं आणि सल्ल्यामुळं हेही संकट पांडवांनी पार केलं.

लाक्षागृहात पांडव जळून मेले या आनंदात धृतराष्ट्र आणि कौरव होते. पांडवही ब्राह्मणवेश धारण करून कालक्रमणा करत होते. कौरव पांडव एकमेकांसमोर आले ते द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. पांडव जिवंत आहेत हे बघून कौरव चकित झाले. दुःखी झाले. आता पांडवांचा विवाह द्रौपदीशी झाला होता. द्रुपदाचे सामर्थ्य त्यांच्यामागे होते. हे सगळे लक्षात घेऊन वरकरणी आनंदाने धृतराष्ट्राने त्यांचे स्वागत केले. आता खरे तर राज्य त्यांच्या ताब्यात द्यायला हवे होते. पण धृतराष्ट्राने त्यांना सांगितले – माझी मुलं आणि तुम्ही एकत्र राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी राहणेच मला योग्य वाटते. तेव्हा अर्धे राज्य घेऊन तुम्ही खांडवप्रस्थत खांडवप्रस्थात राहावे. राज्याचे अधिकारी असून मिळालं काय निबिड अरण्य.

पण युधिष्ठिराने सहजपणे मान्य केले. तिथेच इंद्रप्रस्थ वसवले. पांडवांनी आपल्या पराक्रमाने राज्याचा विस्तार केला आणि इंद्रप्रस्थाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. याच इंद्रप्रस्थात युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करायचे ठरवले. कौरवांनाही बोलावले होतेच. ते सारे वैभव बघून दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचं ते सारे ऐश्वर्य बघणं त्याला असह्य होऊ लागलं आणि त्यातच भर म्हणून की काय मयसभेत त्याची फजिती झाली. सारेजण हसले. द्रौपदीही  हसली.

आणि त्यातूनच दयुताची – कपटदयुताची कल्पना जन्मली. पांडवांना निष्कांचन आणि अपमानित करण्याच्या इराद्याने धर्मराजाला दयुताचे निमंत्रण केले गेले. युद्ध आणि दयुत याचे आव्हान टाळायचे नाही हा युधिष्ठिराचा नियम. म्हणून दयुत खेळायला येत नसताना, विदुराचा सल्ला बाजूला सारून ते निमंत्रण धर्मराजाने स्वीकारले. पांडव पुरते निष्कांचन झाले, कौरवांचे दास झाले आणि माणुसकीला काळिमा फासणारा द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग घडला. राजसभेतले सर्व जेष्ठ गप्प होते. एकटा विदुर याला विरोध करत होता.

कृष्ण द्रौपदीचा पाठीराखा आहे हे कळल्यावर आपल्या पुत्रांविषयी धृतराष्ट्राला काळजी वाटू लागली. त्याने द्रौपदी आणि पांडवांना दास्यमुक्त करून इंद्रप्रस्थाकडे जायला सांगितले. दुर्योधन, शकुनी यांना हे अजिबात आवडले नाही व शकुनीच्या सांगण्यानुसार युधिष्ठिराला पुन्हा द्द्यूतासाठी दुर्योधनाने बोलावले. याला अनुद्द्यूत म्हणतात. त्यात पुन्हा पांडव हरले आणि बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगण्यासाठी वनाकडे निघून गेले.

अज्ञातवास संपला. सतत अन्याय करून कौरवांनी आपले घेतलेले राज्य परत मिळवायला हवे होते. पण हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. प्रथम द्रुपदाचा पुरोहित आणि नंतर खुद्द श्रीकृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे गेले आणि केवळ पाच गावांची दयाभाग म्हणून मागणी केली. तीही दुर्योधनाने धुडकावली. इतकेच नाही तर सुईच्या अग्रावर मावेल एवढी भूमीही देणार नाही असे सांगितले. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता.

Leave a comment