श्रीमद् भगवद्गीता हा भारतीय तत्त्वचिंतन परंपरेतील, श्रेष्ठतम असा अध्यात्म-ग्रंथ आहे. या ग्रंथातील, वैदिक, ‘विश्वात्म’ भाव हा खरोखरच अवघ्या मानव जातीला उपकारक आहे. या श्रीमद् भगवद्गगीतेतील, ‘गीताधर्माचा’ आणि तिच्यातील ‘विचार-विश्वाचा’, सर्वांना परिचय करून देण्यासाठी, गीताधर्म मंडळ, सदाशिव पेठ, पुणे – ३० ही सामाजिक-सांस्कृतिक संस्था, गेली १००  वर्षे अविरतपणे प्रयत्न करीत आहे. 

भारतीय राष्ट्रवादाचे जनक, लोकमान्य टिळक यांच्या ‘गीता रहस्य’ या ग्रंथातील, ‘ज्ञानयुक्त-भक्तिप्रवण-कर्मयोगाचा’ सर्वत्र प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी झटणे ही गीताधर्म मंडळाची प्राणभूत निष्ठा आहे. अशा या गीताधर्म मंडळाची स्थापना इ. स. १९२४ ला झाली असून, सोसायटीज रजिस्ट्रेशन कायद्याप्रमाणे नोंदणी क्रमांक १२३५-अ-५०४, दि. ३/१२/१९२६ हा आहे. तसेच मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्याप्रमाणे नोंदणी क्रमांक एफ-३९, दि. ३०.१०.१९५२ असा आहे. आपल्या गीताधर्म मंडळाचे ध्येय-धोरण, मंडळाच्या घटनेत, आवर्जून नमूद केले आहे. ते असे.

१). ध्येय – श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी, ‘गीतारहस्या’त प्रतिपादन केलेल्या, कर्मयोगाच्या प्रसाराने, भारतवर्षाच्या राष्ट्रधर्माची सर्वांगीण उन्नती करणे-असे मंडळाचे ध्येय राहील.

2). धोरण – अनेकानेक साधनांनी, गीतेतील कर्मयोगाचा अर्थात राष्ट्रीय धर्माचा, प्रसार व प्रचार करून, लोकशिक्षणाच्या माध्यमातून, सर्वांगीण राष्ट्रोंन्नती साधणे, म्हणजेच राष्ट्राचा अभ्युदय आणि नि:श्रेयस साधणे – असे या मंडळाचे धोरण राहील.